Vitamin

• व्याख्या : 

• शरीराच्या योग्य वाढ, विकास आणि निगेसाठी अति आवश्यक असणारी सेंद्रिय संयुगे म्हणजे जीवनसत्त्व होय. 

सर्व सजीवांच्या वाढीसाठी कर्बोदके, मेद, प्रथिने आवश्यक असतात. या कार्बनी पदार्थांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांची अल्प प्रमाणात आवश्यकता असते. या संयुगांची त्रुटी निर्माण झाल्यास सजीवांची वाढ खुंटते. तसेच त्यांना काही विकार उद्भवतात. अशा कार्बनी संयुगांना जीवनसत्त्वे म्हणतात. अन्नातील विशिष्ट घटकांच्या त्रुटीमुळे विकार उत्पन्न होतो, हे बेरीबेरी विकारासंबंधी झालेल्या संशोधनातून (१८९३ – ९७) क्रिस्तीआन आइकमान या वैज्ञानिकाच्या लक्षात आले. या संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. १९१२ मध्ये कॅसिमिर फून्क या वैज्ञानिकाने या संयुगांना व्हिटॅमिन्स हे नाव दिले.

शरीराला जीवनसत्त्वे ही अल्प प्रमाणात लागतात. शरीरातील चयापचय क्रियांमध्ये विकरांबरोबर जीवनसत्त्वे सहविकर व गतिवर्धक म्हणून भाग घेतात. वनस्पतीत बहुतेक सर्व जीवनसत्त्वांची अथवा त्यांच्या पूर्वगामी संयुगांची निर्मिती होते. याउलट सर्व प्राण्यांना जीवनसत्त्वांसाठी आपल्या आहारातील अन्नघटकांवर अवलंबून राहावे लागते. अन्नघटकांप्रमाणे जीवनसत्त्वांचे पचन होत नाही. मात्र ती जठर आणि लहान आतडयात शोषली जातात. त्यानंतर ती गरजेनुसार शरीराच्या भागांत अभिसरण संस्थेदवारे नेली जातात. जीवनसत्त्वांचे स्निग्ध पदार्थात विरघळणारी मेदविद्राव्य व पाण्यात विरघळणारी जलविद्राव्य असे गट केले जाते. अ, ड, ई, के ही मेदविद्राव्य आणि ब, क ही जलविद्राव्य जीवनसत्त्वे आहेत.

Leave a Comment